माळशिरस बार असोसिएशनकडून दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा तीव्र निषेध; दोषींवर कारवाईची मागणी

भूमीपुत्र न्यूज
दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद माळशिरसमध्ये उमटले आहेत. या घटनेचा माळशिरस बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांची जबाबदारी निश्चित करावी, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि. २३ जुलै) माळशिरसच्या तहसीलदारांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.
बार असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करत होते. मात्र, २० जुलै २०२६ रोजी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार केला. पोलिसांचे हे कृत्य लोकशाही मूल्यांना व मानवी हक्कांना काळिमा फासणारे असून, अभ्यासू विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे, अशी भावना वकील संघटनेने व्यक्त केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:पोलिस आयुक्तांचे निलंबन: विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करण्यास जबाबदार असणाऱ्या दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.शिक्षामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा.
दोषींवर कारवाई: लाठीमार प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी.
निवेदन गुरुवारी, २३ जुलै २०२६ रोजी माळशिरस बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी एकत्र येऊन माळशिरसचे तहसीलदार यांना दिले.




