संक्रांत अन् भोगीचं नातं काय? कशी बनवतात भोगीची भाजी ?
भूमीपुत्र न्यूज
कृषीप्रधान संस्कृतीतला एक महत्वपूर्ण सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ म्हणून साजरा करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल. पण नेमकं भोगी ही भानगड काय असते? ती का साजरी केली जाते? ‘भोगी’हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला मानाचा सण असतो.
संपूर्ण भारतभरासह महाराष्ट्रात भोगी हा सण ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं संबोधलं जाते. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’,राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी घरासमोर सडा-सारवण करुन दारात रांगोळी काढली जाते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तसेच या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. जानेवारीत थंडी पडलेली असते, त्यामुळे अंग उलतं. गरम पाण्यात तिळ टाकले तर तिळाचं तेल त्या पाण्यात उतरतं अन् ते शरीराला लागतं. त्यामुळे अंग चोपडं होतं, असं सांगितलं जातं. विदर्भ-मराठवाड्यात या दिवशी सासुरवाशीण मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भोगीची भाजी घरा-घरात शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेतात नवीन मालाला बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो. घरात शेतातलं पिक आलेलं असतं, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं.
भोगीच्या दिवसात गुलाबी थंडी सुरू झालेली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते. म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनवली जाते. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं. तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खमंग खिचडीही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते.भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र, कोस बदलला की ती करण्याच्या पद्धतीत देखील थोडाबहुत फरक होतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भोगीच्या भाजीचा नैवेद्य घरातील कुलदेवतांना तसेच गोठयातील गाईला दाखवून मग घरात शिजलेली खिचडी, भाकरी, भरीत, भाजी याचा संपूर्ण कुटुंब आस्वाद घेतात.भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगूळ भोगीच्या दिवशी तयार करतात.
भोगी साजरी करण्यामागील कारण
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहवा अश्या शुभेच्छा दिल्या जातात.