गुन्हेगारीवर वचक ठेवता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा /रोहन सुरवसे पाटील

भूमीपुत्र न्यूज
राज्यात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणावर फोफावली आहे. दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार, दरोडे आणि दंगली होत आहेत. राज्य भयानक पद्धतीने अशांत झाले आहे. महिलांना बाहेर पडायला देखील भीती वाटावी अशी परिस्थिती आहे.जर गुन्हेगारांवर वचक ठेवता येत नसेल तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
यावेळी पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की,पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी दर्शना पवार हिच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, पुण्यातीलच मुख्य भागातील सदाशिव पेठेत एका तरुणीवर भरदिवसा गर्दीत कोयत्याने हल्ला केला जातो. गुन्हेगारांना इतकी हिम्मत कशी काय आलीय. पुणे शहरात कोयता गँग फोफावली आहे. सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण झाली आहे.
राज्यात जाणीपूर्वक दंगली व्हाव्यात, हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊन त्यातून होणाऱ्या ध्रुवीकरणाचा फायदा घेण्यासाठी कटकारस्थाने रचली जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे औरंगजेबाचे स्टेट्स ठेवणारी गँग निर्माण करून त्यातून राज्य अशांत केले जात आहे. यावरही पोलीस यंत्रणेचा अंकुश राहिलेला नाही.कोणत्याही गुन्हेगारी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चकार शब्द काढायला तयार नाहीत. मात्र, राजकीय वक्तव्ये ते दररोज करतात. त्यांना जर गृहखाते नीट सांभाळता येत नसेल तर त्यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यावा असे रोहन सुरवसे पाटील पाटील म्हणाले.




