परखड ,सडेतोड व रणझुंजार नेतृत्व. स्व. प्रभाकर (आप्पा) तुळशीराम मगर-पाटील.

भूमीपुत्र न्यूज / सुभाष साठे, सरपंच निमगाव म.
मल्हारी मार्तंडाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निमगाव म. मध्ये निमगाव चे माजी सरपंच ह भ प स्व प्रभाकर तुळशीराम मगर पाटील यांचा म्हणजेच आप्पांचा जन्म 20/ 11/ 1943 झाला आणि.10/12/2022. रोजी, ईहलोकीची यात्रा संपवून स्वर्गवासी झाले. गळ्यामध्ये तुळशी माळ आळंदी पंढरीचे आप्पा वारकरी. पांडुरंगाचे निःश्चिम भक्त. देव, देश, आणि गावाप्रती अभिमानी होते. सत्यवादी विचारसरणीचे ते पुरस्कर्ते होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक कार्याला त्यांनी वाहून घेतले होते.



काही माणसे ध्येयवेडी असतात. इतरांचा इतिहास घोकत बसण्यापेक्षा स्वतःचा इतिहास निर्माण करतात. तोच इतिहास पाठीमागील पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो. आप्पांनीही स्वतःचा इतिहास निर्माण केला. जिवनामध्ये वादळ वाऱ्याबरोबर भवसागराच्या अनेक संघर्षाच्या लाटा झेलत आत्मविश्वासाने किनारा गाठणारे फक्त आप्पाच. म्हणून लोकांना ते प्रेरणास्थानी आहेत. कृषीतुल्य स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांचे विश्वासू खंदे समर्थक स्वर्गीय, कृष्णराव यशवंतराव पाटील (आबा) आणि आप्पा. लोकचळवळीतून पुढे आलेले बंधू. माळशिरस तालुक्यातील पारंपारिक विरोधी गट शाबूत ठेवण्यासाठी नेतृत्व करू लागले. जिथे चुकीचे असेल तिथे सोक्ष_मोक्ष दाखवून देण्याचे काम करायचे. प्रसंगी छातीचा कोट करून पहाडासारखे प्रत्येक ठिकाणी उभे असायचे. त्यामुळे तालुक्यातील लोकांना आधाराबरोबर कामाच्या बाबतीत ही आप्पा जवळचे वाटायचे. बघू करू या बाबिला त्यांच्याकडे कसलाही थरा नव्हता. 1984 साली आप्पांनी पाटील तालीमीची निर्मिती केली. आपल्या तीनही मुलांना कुस्ती आखाड्यामध्ये उतरविले. त्यातूनच पुढे पैलवान संजय पाटील हे ऑलम्पिक ग्रीको रोमन पर्यंत खेळून, महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले.



आप्पा सरपंच असताना गावच्या विकासाला खरी च्यालना मिळाली. गावच्या वैभवात त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भरच घातली.1998-99.साली राज्याचे तत्कालीन मंत्री, आर.आर पाटील. यांचे मार्फत तंटामुक्ती व स्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय पुरस्कार मिळाला होता. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हालाही (सुभाष साठे) मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. आप्पा रस्त्याचा प्रश्न, बांधाचे भांडण तर सहजासहजी मिटवायचे. कुठलीही तक्रार पोलीस स्टेशनला जाऊ न देता समोरा समोर न्याय देण्याचे काम करायचे. वाडी, वस्ती रस्ते, हातपंप मार्फत पिण्याच्या पाण्याची सोय, घरकुल योजना, गोरगरीब निराधारांना शासकीय अनुदान मिळवून देणे. गावामध्ये शासकीय इमारती, वस्ती शाळा अंगणवाडी त्यांच्याच काळात झालेले आहेत. निमगावच्या जडणघडणीमध्ये आप्पांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सुगंध आजही दरवळत आहे. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन.






