निमगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

भूमीपुत्र न्यूज
निमगाव येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे आणि ज्येष्ठ पत्रकार भारत मगर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सरपंच सुभाष साठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


त्यांनी आपल्या भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा घेतला व त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.ते म्हणाले की, “नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ अशी हाक देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीची मशाल पेटवली. तर, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला आणि हिंदूंना स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, ‘गर्व से कहो हम हिंदू है’. त्यांचा हा विचार आजही आपल्याला ऊर्जा देणारा आहे.

या दोन्ही महापुरुषांचा त्याग आणि प्रखर राष्ट्रप्रेम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.या वेळी ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील, शिवसेना नेते गोरख पवार, पत्रकार नितीन मगर, नागनाथ मगर, दादासाहेब मगर, दादा पवार, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर कस्तुरे, पै.धनाजी मगर,पप्पू जाधव यांच्यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




