“आमची जमीन जाणार की वाचणार? शक्तीपीठच्या वायरल यादीमुळे ग्रामीण भागात खळबळ!”व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेली गावांची यादी खरी की खोटी?प्रशासन गप्प,शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण!”

भूमीपुत्र न्यूज
नागपूर ते गोवा या प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गा’बाबत सध्या सोशल मीडियावर नकाशांची आणि बाधित गावांच्या याद्यांची मोठी लाट आली आहे.व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर फिरणाऱ्या या याद्यांमुळे आपल्या जमिनी जाणार का? या भीतीने ग्रामीण भागातील शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत.महाराष्ट्र शासनाने या महामार्गाच्या आराखड्यात बदल करण्याची घोषणा केल्यानंतर, आता समाज माध्यमांवर नव्या मार्गावरील ‘बाधित गावांची’ एक यादी वेगाने व्हायरल होत आहे मात्र, या यादीबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) कोणताही अधिकृत दुजोरा किंवा खुलासा करण्यात आलेला नाही, ज्यामुळे ही माहिती अधिकृत असल्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यांची शेती बाधित होणार आहे, ते शेतकरी आता खात्री करण्यासाठी ‘शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती’ आणि ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या प्रस्तावित मार्गामध्ये सांगोला तालुक्याचा समावेश होता, मात्र नवीन व्हायरल यादीमध्ये सांगोला तालुका पूर्णपणे वगळून माळशिरस तालुक्याचा नव्याने समावेश केल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत.
व्हायरल झालेल्या यादीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश नव्या आराखड्यात असल्याचे दाखवले जात आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील जांबुड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदपुरी, तरंफळ, मगरवाडी (न.वि.) आणि गरवाड या ११ गावांचा समावेश आहे. बार्शी तालुक्यातील ७ गावे बाधित दाखवली आहेत. माढा तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. मोहोळ तालुक्यातील ८ गावांतून हा मार्ग प्रस्तावित असल्याचे दिसत आहे. तर पंढरपूर तालुक्यातील ७ गावांची नावे समोर आल्याने अस्वस्थता वाढली आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील उंदरवाडी या एकाच गावाचा उल्लेख या यादीत असून यापूर्वीच्या आराखड्याला झालेल्या तीव्र विरोधामुळे हे बदल झाले असावेत अशी चर्चा आहे.एका गावाला बाजूला काढून इतर गावांचा विरोध शांत करण्याची ही प्रशासनाची रणनीती तर नाही ना,असा प्रश्न आता उपस्थित होत असून रस्ते विकास महामंडळाने यावर अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही.
मार्ग नेमका कोठून जाणार याची अधिकृत माहिती मिळत नसल्याने बागायतदार शेतकऱ्यांमधील संभ्रम वाढत चालला आहे. प्रशासनाने तातडीने माहिती खरी आहे की निव्वळ अफवा,याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
जिल्हानिहाय बाधित गावांची आकडेवारी:
सोलापूर जिल्हा (एकूण ४१ गावे): माळशिरस ११, माढा ८, मोहोळ ८, बार्शी ७, पंढरपूर ७.
कोल्हापूर जिल्हा (एकूण ७४ गावे): भुदरगड १८, राधानगरी १५, आजरा १३, करवीर १०, चांदगड १०, पन्हाळा ५, हातकणंगले २, कागल १.
सांगली जिल्हा (एकूण ३१ गावे): वाळवा ११, खानापूर ५, पलूस ५, कडेगाव ४ आणि मिरज व तासगाव तालुक्यातील गावे.
हिंगोली जिल्हा (एकूण २३ गावे): कळमनुरी १५, वसमत ८.
सातारा जिल्हा (एकूण १६ गावे): माण १०, खटाव ६.
नांदेड जिल्हा: ७ गावे.
सिंधुदुर्ग जिल्हा (एकूण १० गावे): दोडामार्ग ५, सावंतवाडी ५.
हिंगोली (औंढा नागनाथ): १० गावे.
परभणी जिल्हा: ५ गावे.
बीड व सोनपेठ: परळी तालुका १ आणि सोनपेठ १ गाव.




