कोळेगांवची ओळख दारुड्याचं गाव म्हणून करावयाची आहे का ? महिलांचा संतप्त सवाल अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी

भूमीपुत्र न्यूज
कोळेगांव ता माळशिरस येथे मोठया प्रमाणात अवैध दारु धंदे तेजीत चालत आसुन सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे संपूर्ण गावाच वेठीस धरले आहे. गावांमधील अवैध धंदे जर वेळीच बंद झाले नाहीत तर दारुड्याचं गाव म्हणून कोळेगावची ओळख महाराष्ट्रात निर्माण होईल आणि प्रशासनाला नेमकं हेच करायचं आहे का ? असा संतप्त सवाल कोळेगाव ता माळशिरस येथील महिलांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . निवेदनावर गावातील सहाशे महिलांनी सह्या केलेला अर्ज जोडला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की,गावांमध्ये कायदा, शांतता, सुव्यवस्था बिघडली आहे. रस्त्यावरून फिरणा-या महिलांना जिव मुठीत घेवून फिरावे लागत आहे. शालेय शिक्षण घेणा-या मुला-मुलींना याचा त्रास होत असून शाळेच्या आजुबाजूला हे दारुचे आड्डे चालत आहेत. गावामधील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जावून स्वतःचे जीवन उध्वस्त करताना दिसत आहे. शांतता बिघडली असल्यामुळे गावात शांतता सलोखा ठेवणे अशक्य झालेले आहे. अशा गोष्टींना वेळीच आवर घातला नाही तर गांव विनाशाच्या मार्गावर जाणेची शक्यता आहे. महिलांनी कमवलेले चार पैसे घरातील कर्तेपुरुष दारु पिण्यासाठी नेत आहेत व ते पैसे नाही दिले तर महिलांना मारहाण केली जाते व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
तरी या गावातील शांतता व सुव्यवस्था टिकविण्यसाठी गांवातील अवैध धंदयांना वेळीच लगाम घालून गांव टिकवणे गरजेचे आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून गांवातील अवैध धंदे मोडीत काढून या गांवामध्ये दारुच्या बाबतीमध्ये मतदान प्रक्रीया घेण्यात यावी व परवाना व बिगर परवाना धारक धंदे व दारु धंदे बंद होणे गरजेचे असून वेळीच या धंद्याला लगाम घालावा असे या निवेदनात म्हटले आहे . यामुळे कोळेगावात दारूची बाटली उभी राहणार का ? आडवी होणार हे प्रशासन कधी ठरवणार याबाबतीत माळशिरस तालुक्यात चर्चांना उधाण आल आहे .




